SSC HSC Exam Latest News 2026 | घरात दहावी किंवा बारावीचा मुलगा किंवा मुलगी असली की नुसत्या अभ्यासाच्याच गप्पा सुरू असतात. “वेळापत्रक कधी येणार?” हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि पालकांच्या मनात असतो. आता ती प्रतीक्षा संपली आहे! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २०२६ च्या परीक्षेचं बिगुल वाजवलं आहे. यंदा परीक्षा थोड्या लवकर होणार असल्याचं चिन्ह आहे, त्यामुळे आता मुलांनी दप्तर घेऊन अभ्यासाला भिडण्याची खरी वेळ आली आहे.SSC HSC Exam Latest News 2026
दहावी-बारावीच्या महत्त्वाच्या तारखा
शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीची (HSC) लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. तर, दहावीच्या (SSC) परीक्षा २० फेब्रुवारीला सुरू होतील आणि १८ मार्च २०२६ पर्यंत चालतील. विशेष म्हणजे, दोन्ही वर्गांच्या परीक्षा एकाच दिवशी संपणार आहेत. त्यामुळे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात मुलांच्या डोक्यावरचं ओझं उतरणार आहे.
प्रात्यक्षिक परीक्षांचा जोर
लेखी परीक्षेपूर्वी होणाऱ्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांची (Practical Exams) तयारीही आता वेगाने करावी लागणार आहे. कारण २३ जानेवारी २०२६ पासूनच प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात होणार आहे. म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या आधीच मुलांच्या परीक्षेचा सराव सुरू झालेला असेल. सविस्तर वेळापत्रकासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत किंवा मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवावं.
इतर बोर्डांच्याही तारखा आल्या समोर
केवळ महाराष्ट्र बोर्डच नाही, तर CBSE बोर्डानेही आपली कंबर कसली आहे. CBSE च्या प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारीपासूनच सुरू होतील, तर लेखी परीक्षा १७ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२६ या काळात चालतील. तसेच मध्यप्रदेश (MP) बोर्डाच्या परीक्षाही फेब्रुवारी महिन्यातच सुरू होणार आहेत. एकूणच काय, तर फेब्रुवारी महिना विद्यार्थ्यांसाठी मोठ्या परीक्षेचा ठरणार आहे.
शेवटी पालकांना एकच सांगणं आहे, परीक्षेच्या काळात मुलांवर जास्त दडपण आणू नका. अभ्यास तर होणारच आहे, पण त्यासोबत त्यांच्या आहाराची आणि झोप्येचीही काळजी घ्या. मुलांच्या मेहनतीला तुमच्या विश्वासाची जोड मिळाली, की निकालाचा गुलाल नक्कीच उधळला जाईल!
Good