Mumbai-Pune Missing Link Project: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक सुखद बातमी आहे. लोणावळ्याचा तो वळणदार घाट, पावसाळ्यातील दरडी कोसळण्याची भीती आणि ट्रॅफिक जॅम… या सगळ्या त्रासातून आता तुमची कायमची सुटका होणार आहे. बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले असून, लवकरच हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. Mumbai-Pune Missing Link Project
२० ते २५ मिनिटांची होणार बचत
मुंबई ते पुणे हे अंतर आता पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पार करता येणार आहे. या नवीन मार्गामुळे प्रवाशांचा तब्बल २० ते २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. नुकतीच या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली असून, कामाचा वेग पाहता येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे.
इंजिनिअरिंगचा अजब चमत्कार!
हा प्रकल्प म्हणजे केवळ एक रस्ता नसून आधुनिक अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे. या मार्गाची काही खास वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
जगातील सर्वात रुंद बोगदा: येथे दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ५ लेन, अशा एकूण १० लेनचा मार्ग आहे.
देशातील सर्वात मोठा बोगदा: सुमारे ९ किलोमीटर लांबीचा हा बोगदा रस्ते वाहतुकीसाठीचा देशातील सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे.
सुरक्षित प्रवास: प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे टेन्शन आता प्रवाशांना राहणार नाही.
३१ मार्चची डेडलाईन
लोणावळा घाटातील ‘केबल स्टेड’ पुलाचे काम सध्या रात्रंदिवस युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात या मार्गाची तांत्रिक चाचणी आणि सुरक्षा तपासणी पार पडेल. त्यानंतर १ मे रोजी या मार्गावरून गाड्या धावू लागतील, असा सरकारचा मानस आहे.
महत्त्वाचा मुद्दा: लोणावळा घाटातील सध्याचा रस्ता हा वळणदार आणि चढ-उताराचा असल्याने जड वाहनांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण झाल्यावर एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.