EPFO pension latest news today | महागाईच्या या काळात जिथे भाजीपाल्याचा जुडा घ्यायलाही खिशातले शंभर-दोनशे रुपये कधी गायब होतात हे समजत नाही, तिथे केवळ १००० रुपयांत महिना कसा काढायचा? हाच आर्त प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून देशातील लाखो ‘EPS-95’ पेन्शनधारक विचारत आहेत. पण, आता या प्रश्नाचे उत्तर कदाचित आगामी ‘बजेट २०२६’ मध्ये मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या हक्काच्या पैशासाठी डोळ्यात तेल घालून वाट पाहणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.
खरे तर, गेल्या १०-११ वर्षांत दुध, धान्य आणि औषधांच्या किमती दुप्पट-तिप्पट झाल्या, पण पेन्शनची ती १००० रुपयांची सुई मात्र हलण्याचे नाव घेईना. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठा संताप होता. आपली आयुष्यभर सेवा दिल्यानंतर निवृत्तीच्या काळात किमान सन्मानाने जगता यावे, एवढीच या पेन्शनधारकांची माफक अपेक्षा आहे. हीच गरज ओळखून आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पोतडीतून पेन्शन वाढीचा मोठा निर्णय बाहेर येण्याची चिन्हे आहेत.
५,००० की १०,०००? चर्चा तर मोठी आहे!
सध्या सरकारी वर्तुळात दोन महत्त्वाच्या प्रस्तावांची जोरदार चर्चा सुरू आहे. गुडरिटर्न्सच्या रिपोर्टनुसार, सरकार किमान पेन्शन ५,००० रुपये करण्यावर गांभीर्याने विचार करत आहे. यामुळे तिजोरीवर फार मोठा भार न पडता सामान्य पेन्शनधारकाला एक चांगला आधार मिळेल. मात्र, दुसरीकडे कर्मचारी संघटनांनी १०,००० रुपयांची मागणी लावून धरली आहे. जर सरकारने लोकांच्या हातात पैसा खेळता ठेवून बाजारपेठेला चालना देण्याचे ठरवले, तर हा आकडा १०,००० पर्यंतही जाऊ शकतो.
ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांत आशेचा किरण
EPS-95 योजनेतील कर्मचारी म्हणजे ते लोक ज्यांनी देशाच्या विकासात आपल्या उमेदीच्या काळातील १०-१०, २०-२० वर्षे खर्ची घातली आहेत. मालकाच्या पगारातून कापला गेलेला ८.३३% हिस्सा आज त्यांना म्हातारपणाची काठी म्हणून हवा आहे. कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या विधानानंतर आता पेन्शनधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
बजेटच्या दिवशी केवळ आकडेमोड न होता, अनेक वर्षांपासून रखडलेला हा वनवास संपणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर ही वाढ झाली, तर खऱ्या अर्थाने देशातील लाखो घरांमध्ये ‘अच्छे दिन’ येतील आणि सन्मानाने जगण्याची एक नवी उमेद पेन्शनधारकांना मिळेल.